कोणाही कितीही प्रयत्न केले तरी मुंबईपासून बॉलिवूड वेगळे होणार नाही – सुप्रिया सुळे


पुणे – मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे स्वागत आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी बॉलिवूडला मुंबईपासून वेगळे केले जाणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दुधात साखर विरघळल्यासारखे मुंबई आणि बॉलिवूडचे नाते असल्यामुळे कितीही प्रयत्न केले, तरी बॉलिवूड वेगळे केले जाणार नसल्याचे बारामतीमध्ये मतदान केंद्रावर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

2 डिसेंबरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते त्यावेळी काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, कार्यकर्ते आणि संघटना नीट ठेवण्यासाठी सरकार पडणार असल्याचे विरोधक बोलत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.