उत्तर प्रदेशात बॉलिवूड नेण्यासाठी योगी आदित्यनाथांची उद्या मुंबईत पहिली बैठक


मुंबई – बुधवारी म्हणजेच उद्या मुंबई दौऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार असून बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये योगी आदित्यनाथ जाणार आहेत. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यावेळी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.

योगी आदित्यनाथ १ डिसेंबरच्या रात्री लखनऊहून मुंबईसाठी रवाना होतील. योगी आदित्यनाथ २ डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना आमंत्रित करतील. दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी या बैठकीत उपस्थित राहतील अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी सप्टेंबर महिन्यात एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. एका चांगल्या फिल्मसिटीची देशाला गरज असून उत्तर प्रदेशमध्ये आम्ही एका भव्य फिल्मसिटीची निर्मिती करणार असल्याचे म्हटले होते. अनेक सेलिब्रेटींनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे स्वागत केले होते. यासंबंधी लखनऊमध्येही योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेतली होती.

नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी राखून ठेवली आहे. बॉलिवूडपेक्षाही मोठी ही फिल्मसिटी असेल, असे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे. योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत एन चंद्रशेखर, बाबा कल्याणी, हिरानंदानी यांचा समावेश आहेत. ही बैठक ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडणार आहे.