उद्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात उर्मिला मातोंडकर


मुंबई – काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा काही महिन्यांपूर्वी राजीनामा देत राजकारणापासून दूर गेलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. पण यावेळेस ती शिवसेनेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणार आहे. उर्मिला मातोंडकर सोमवारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीपासूनच ती शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच विधान परिषदेसाठीही शिवसेनेकडून तिच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे समोर आले होते. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

सातत्याने राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफुस सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी सोपवण्यात आली होती. १२ नावांची यादी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आल्याचे समोर आले होते.

काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांनी निवडणुकीनंतर आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.