
जालना : सध्या सोशल मीडियावर भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांना फोन करून बबनराव लोणीकर यांनी पोलिसांना विधानसभेत उलटे टांगू, अशी धमकी दिल्याचे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
माजी मंत्री बबनराव लोणीकरांची पोलीस अधिकाऱ्याला धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल
आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना तीन दिवसांपूर्वी परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची टीप मिळाल्यानंतर हसन गौहर यांनी पथकासह त्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. पण छापेमारीत त्यांना काहीच आढळून आले नाही. भाजप नेते बबनराव लोणीकरांसमोर संबंधित व्यापाऱ्याने घडलेली सर्व कैफियत मांडल्यानंतर लोणीकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचे सांगण्यात येत आहे.
क्लिपमध्ये बबनराव लोणीकर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना ऐकायला मिळत आहे. न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलीस व्यापाऱ्यांच्या घरात घुसता कसे? असा सवाल आयपीएल अधिकाऱ्यांना बबनराव लोणीकर यांनी केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनंतरच धाड टाकली होती, पण त्यामध्ये काहीच आक्षेपार्ह्य सापडले नसल्याचे सांगितले. बबनराव लोणीकर पोलीस अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर संतापले आणि त्यांनी विधानसभेत तुम्हा सगळ्यांना उलटे टांगेन अशी धमकी दिली.
