
इस्लामाबाद – पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले असून या महिलेने स्वत:ला बाबर आजमची शाळेतील मैत्रिण असल्याचे सांगितले. पत्रकार परिषद घेत या महिलेने बाबर आजमवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. वेळप्रसंगी बाबर आजमला आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेने केला आहे.
पाक कर्णधार बाबर आजमवर लैंगिक शोषणाचे आरोप
महिला पत्रकार परिषदेत म्हणाली की, मी शाळेत असल्यापासून बाबर आजमला ओळखते. आम्ही एकत्र शिकलो असून एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे आमच्यात चांगली मैत्रीही झाली होती. बाबर आजमने २०१० मध्ये लग्नासाठी मला प्रपोज केले होते. मी देखील होकार दिला होता. पण आमच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे बाबरने २०११ मध्ये मला पळवून नेले. मला वेगवेगळ्या ठिकाणी त्याने ठेवले. त्याने काही दिवसानंतर लग्न करण्याचा आपला निर्णय बदलला. त्याचबरोबर पोलिसांत गेल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये ती महिला बाबर आजमवर आरोप करत असल्याचे दिसत आहे.
