दुनिया घुम लो, पुण्याच्या पुढे काही नाही; लस येथेच सापडणार – सुप्रिया सुळे


पुणे – मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुनिया घुम लो, शेवटी लस पुण्यातच सापडणार असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. दिल्लीची आम्हाला सवय आहे. येथे १५०० कोटी, १६०० कोटींची विकासकामे होत असल्याचे मी ऐकले आहे. तर दिल्लीत एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. त्या आम्ही गप्पा ऐकतो.. हे कोण बोलते ते तुम्हाला माहित आहे. ते आता पुण्यात आले आहेत. दुनिया घुम लो, पुण्याच्या पुढे काही नाही. तुम्ही जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. पुणेकरांनी ती लस शोधली आहे. अन्यथा ते म्हणायचे मीच शोधली, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

पुण्यातच कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली आहे, हे लक्षात ठेवा. पुणेकरांनी ही लस शोधली आहे. कुणी बाहेरुन क्लेम केला, तर गैरसमज करुन घेऊ नये, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. नुकताच सीरम इन्स्टिट्युटचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा केला. सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावरुन त्यांना टोला लगावला. आता मी येथे आज सुनीलभाऊंच्या घरी आले आहे. पण येथील स्वयंपाक मी केलेला नाही. तसेच पुणेकरांनी लस ही आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी क्लेम केल्यास तुम्हाला सांगता येईल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.