मोदींच्या हस्ते उद्धाटन झालेली गुजरातमधील सी-प्लेन सेवा एका महिन्यातच बंद


अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबरला गुजरातमध्ये अहमदाबाद-केवडियादरम्यान चालविण्यात येणाऱया सी-प्लेन सेवेची सुरुवात केली होती. आता एका महिन्यातच बंद पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेली ही सी-प्लेन सेवा पडली आहे. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आलेली ही सेवा परत कधी सुरू होईल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

31 ऑक्टोबरला अहमदाबाद-केवडिया सी-प्लेनचे उद्घाटन झाल्यानंतर ही सेवा 1 नोव्हेंबरपासून जनतेसाठी खुली करण्यात आली होती. या 28 दिवसांमध्ये दोन वेळा 3-3 दिवसांसाठी सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी क्रू मेंबरला आराम देण्यासाठी, असे केले जात असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. आता ही सेवा पुन्हा देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आली आहे. ही सेवा बंद करताना परत कधी सुरू होणार याबाबतची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेली नाही.

गुजरातमध्ये देशातील पहिलीच सी-प्लेन सेवा सुरू करण्यात आली आहे, पण यात वापरले जाणारे विमान 50 वर्षे जुने आहे. पण हे ऑपरेट करणाऱ्या स्पाईसजेट कंपनीकडून हे विमान चांगल्या स्थितीत आणि सर्वात सुरक्षित एअरक्राफ्टमधून एक असल्याचा दावा केला जात आहे. सी-प्लेन ऑपरेटर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आनंद देव यांनी सी-प्लेन मेंटेनन्ससाठी मालदीवला पाठवण्यात आले आहे. यास काही दिवस लागू शकतात, असे म्हटले आहे.