अरबी समुद्रात कोसळले नौदलाचे मिग-२९के विमान


नवी दिल्ली – भारतीय नौदलाचे प्रशिक्षक मिग-२९के विमान गुरुवारी अरबी समुद्रात कोसळले असून हे विमान अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना दुर्घटनाग्रस्त झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. एका वैमानिकाला रेस्क्यू टीमने वाचवले असून दुसऱ्या वैमानिकाचा अद्याप शोध सुरु आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

यासंबंधीची अधिकृत माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे. २६ नोव्हेंबरला पाच वाजता भारतीय नौदलाचे मिग-२९के प्रशिक्षक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. एका वैमानिकाचा शोध लागला असून दुसऱ्या वैमानिकाचा हवाई तसेच समुद्रमार्गे शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

याआधीही अनेकदा मिग-२९ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. पंजाबमधील नवाशहर येथे ८ मे २०२० रोजी नौदलाचे लढाऊ विमान मिग-२९ तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाले होते. यावेळी पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारुन वैमानिकाने आपला जीव वाचवला होता. विमान एका शेतात दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे शेताला आग लागली होती.

तर गोव्यात २३ फेब्रुवारी २०२० रोजी मिग-२९ दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेतून वैमानिक सुखरुपपणे बाहेर पडला होता. विमानाने सकाळी १० वाजता प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. पण काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती एअर ट्राफिक कंट्रोलला देण्यात आली. याचदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले.