प्रियम गांधी यांच्या Trading Power पुस्तकावर रोहित पवारांची प्रतिक्रिया


सोलापूर : लेखिका प्रियम गांधी यांनी आपल्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकात रोहित पवारांना बळ देण्यात आले असून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना डावलले जात असल्याचा दावा देण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी माझ्यासाठी नाते महत्वाचे आहे. पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीपेक्षा नाते कसे आहे हे मला जास्त माहित असल्याची प्रतिक्रिया सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

त्याचबरोबर कोणतेही पुस्तक हे लेखकाच्या डोक्याने लिहिले जाते. माझा जास्त वेळ आज कोणत्या समस्या आहेत याबाबत वाचण्यात जातो. त्यामुळे हे जे काही पुस्तक आलेले आहे. केवळ त्याचे मी कव्हर पेज पाहिले आहे. पुस्तकात काय लिहिले आहे, याची मला माहिती नाही. आणखी काही गोष्टी पुस्तकात लिहिल्याचे कळले. ही माहिती त्यांना कुठून मिळाली हे पुस्तक लिहणाऱ्या व्यक्तीलाच विचारावे लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी यावेळी लव्ह जिहादच्या मुद्यावर देखील भाष्य केलं. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. मला याबाबत जास्त खोलात जायचे नाही. भाजपचे काही मोठे नेते आहेत, त्यांच्या घरात देखील अशा पद्धतीने लग्न झालेली आहेत. हा पूर्णपणे वैयक्तिक विषय आहे. लग्नाबाबत निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीचा असतो. संविधानाने त्यांना हा हक्क दिला आहे. राम कदम यांना सांगा की राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा मुद्दा आहे. भाजपने पाच वर्षात केलेल्या पराक्रमाचे हे परिणाम आहेत. मुख्य मुद्दा सोडून इतर मुद्यांवर बोलत बसल्यास भविष्यातील पिढी ही बर्बाद होईल, अशी टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली.

रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरा केला. त्यांनी यावेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळपास सहा विविध ठिकाणी सभा देखील घेतल्या. आमदार रोहित पवार यांनी करमाळा, टेंभूर्णी, मोहोळ, बार्शी, कुर्डूवाडी इत्यादी ठिकाणी मेळावे, बैठका, सभा घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तरुणांची मोठी गर्दी या सभांना पाहायला मिळाली. सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आमदार रोहित पवार यांच्यासह सेल्फी घेण्यासाठी, सत्कार करण्यासाठी युवकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रियम गांधी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकात शरद पवार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देणार होते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच पार्थ पवारांना डावलले जाते आहे आणि रोहित पवारांचे बळ वाढवले जात असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे पवार घराण्यात सारे काही आलबेल नाही अशी चर्चा या पुस्तकाच्या निमित्ताने रंगली आहे. परंतु हे सगळे दावे रोहित पवार यांनी फेटाळले आहेत.