एका अटीवर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस सोडण्यास तयार !


वॉशिंग्टन – अखेर व्हाईट हाऊस सोडण्याचे संकेत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. पण, त्यांनी यासाठी एक अट ठेवली आहे. इलेक्टोरल कॉलेजकडून जर जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आले तरच मी व्हाईट हाऊस सोडायला तयार असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर गुरूवारी पहिल्यांदाच माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी यावेळी जर जो बायडन यांना इलेक्टोरल कॉलेजनी निवडणुकीचा विजेता ठरवले तर मी निश्चितपणे व्हाईट हाऊस सोडेन. या निवडणुकीत घोटाळा झाला असून हा एक उच्च स्तरीय घोटाळा असल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. तसेच, जर जो बायडन यांना इलेक्टोरल कॉलेजनी विजेता म्हणून घोषित केले, तर ती त्यांची मोठी चूक ठरेल, असेही ट्रम्प म्हणाले.

अलिकडेच झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. पण, आपला हा पराभव मान्य करायला डोनाल्ड ट्रम्प तयार नव्हते. आपला निवडणुकीत पराभव होत आहे, हे लक्षात येताच त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आता व्हाईट हाऊस सोडण्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. दरम्यान, इलेक्टोरल कॉलेज मतांवर अखेरचा निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. अमेरिकी इलेक्टोरल कॉलेज 14 डिसेंबर रोजी बायडन यांच्या विजयाची घोषणा करण्याची शक्यता असून त्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील, अशी माहिती आहे.