मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई नियमानुसारच; महापौर किशोरी पेडणेकर


मुंबई – मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असले तरी मुंबई महापालिकेने केलेली कारवाई नियमानुसारच केली असल्याचे ठाम मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या कायदेशीर बाजू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. उच्च न्यायालयाने कंगनाच्या याचिकेवर दिलेल्या निकालानंतर पुढील रुपरेषा या बैठकीत ठरविण्यात येणार असल्याचे कळते. मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली आहे. मी अद्याप न्यायालयाने दिलेला निकाल वाचलेला नाही. तो वाचल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल, असे पेडणेकर म्हणाल्या.

कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई अवैध असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. यासोबत नुकसान भरपाईचे आदेशही दिले आहेत. यासाठी झालेल्या नुकसानाचे मुल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण अधिकारी नेमण्यास न्यायालयाने सांगितले आहे व त्याचा अहवाल मार्च २०२१ पूर्वी सादर करावा लागणार आहे.