पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत राहणार महाविकास आघाडी सरकार – अनिल देशमुख


नागपूरः सरकार पाच वर्षे चालणार असे मुख्यमंत्र्यांनी जरी म्हटल असले तरी मला वाटते की पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत महाविकास आघाडी सरकार राहिल, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलून दाखवला. गेल्या वर्षभरात सरकारने चांगली कामे केल्यामुळे राज्यातील जनता समाधानी असल्याचेही ते म्हणाले आहेत.

ईडीसारख्या मोठ्या संस्थेचा केंद्र सरकार गैरवापर करत आहेत. पण हे चुकीचे असल्यामुळेच राज्यात सीबीआयला आम्ही परवानगीशिवाय प्रवेशबंदी केल्यानंतर अनेक राज्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

गुंडांनी भूखंड बळकावण्याचे अनेक प्रकार नागपुरात घडले आहेत. आम्ही अशा तक्रारीनंतर नागपुरात मोठी कारवाई केली. राज्यभरात भूखंड बळकावणाऱ्यांवर आता अशाच प्रकारे कडक कारवाई करणार आहोत. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मी आणि पत्नीने पोलिसांच्या परिवारासोबत दिवाळी साजरी केली. पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी याचा मोठा फायदा झाला, अशा भावनाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.