न्यायालयाच्या निर्णयानंतर बंद झाली संजय राऊतांची बोलती; सोमय्यांचा टोला


मुंबई – मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना राणावतविरोधात करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर पालिकेकडून कंगनाला पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती.


संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करत कंगनाने मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर त्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. त्यानंतर ही कारवाई महापालिकेकडून करण्यात आली होती. आपल्या वक्तव्याविरोधात ही कारवाई असल्याचे सांगत कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या निर्णयानंतर आता संजय राऊतांची या निकालामुळे बोलती बंद झाल्याचा टोला लगावला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्या यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोमय्या यांनी या व्हिडीओमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कंगना राणावत प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुंबईच्या महापौरांनी आणि पालिका आयुक्तांनी आता राजीनामा द्यायला हवा. संजय राऊत यांची तर बोलतीच बंद झाली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.