ईडीने केली प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना अटक


मुंबई – अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर ईडीने याप्रकरणी बुधवारी संध्याकाळी पहिली अटक केली. ही अटकेची कारवाई सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांच्यावर करण्यात आली असून टॉप्स समूहाचे चांदोळे हे भागीदार आहेत.

सरनाईक आणि राहुल नंदा यांच्यातील व्यवहारांबाबतची माहिती चांदोळे यांच्या अटकेमुळे समोर येईल अशी ईडीला आशा आहे. टॉप्स ग्रुपचे नंदा हे प्रमोटर आहेत. नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कंपनीच्या निधीचा बेकायदा पद्धतीने फेरफार केल्याचा आरोप या ग्रुपचे माजी सीईओ रमेश अय्यर यांनी केला आहे.

मंगळवारी सरनाईक यांच्या कार्यालयावर छापेमारीदरम्यान ईडीने परदेशी बँकेचे एक डेबिट कार्ड जप्त केले आहे. प्रताप सरनाईक यांच्या नावे हे डेबिट कार्ड फ्रिमोन्ट बँकेने इश्यू केले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील फरहाद दाद्रास येथील ज्यावर पत्ता आहे. टाइम्स न्यूजने सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या छापेमारीत ईडीला पैशांच्या व्यवहारांच्या काही नोंदी आणि कागदपत्रे आढळून आले आहेत. हवाला व्यवहारांच्या या नोंदी असल्याचे दर्शवत आहे. या नोंदी ज्या कंपन्यांबाबतच्या आहेत त्या प्रताप सरनाईक यांच्याकडून चालवल्या जातात. दरम्यान, प्रताप सरनाईक ईडीच्या कारवाईनंतर परदेशातून मुंबईत परतल्याने सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर ईडीद्वारे त्यांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात येईल.