अमेरिकेत कोरोनाचे मृत्युतांडव; दर ४० सेंकदाला होत आहे एका कोरोनाबाधिताचा मृत्यू


वॉशिंग्टन – काही दिवसांसाठी शांत झालेल्या कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोकेवर काढले आहे. जगभरात कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच जगभरातील अनेक देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. पण या कोरोनामुळे सर्वात भयाण परिस्थिती अमेरिकेत निर्माण झाली आहे. अमेरिकेत तब्बल सहा महिन्यानंतर अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, दर ४० सेंकदाला एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागत आहेत.

कोरोनाचे संकट अमेरिकेत अधिक गडद होताना दिसत आहे. मागील सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासात कोरोना संसर्गामुळे २ हजार १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात ४० सेंकदात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून कोरोनामुळे अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.

कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढत असल्यामुळे अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये नव्या कोरोनाबाधितांसाठी बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. अमेरिकेत मंगळवारी १ लाख ७० नवीन रुग्ण आढळून आले. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १२.६ मिलियन नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. मंगळवारी मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ सहा महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत २४ तासांत ३ हजार ३८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

अमेरिकेसारखी भयावह परिस्थिती भारतात नसली, तरी चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक राज्यांमध्ये वाढला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तर इतर राज्यांमध्ये दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येने मोठी उसळी घेतली असल्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध आणले जात आहेत.