उद्या धमाका म्हणत, मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा वादळी प्रोमो राऊत यांनी केला शेअर


मुंबई : शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून उद्या ही मुलाखत प्रसारित होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी या मुलाखतीचा प्रोमो शेअर केला आहे. संजय राऊत या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री ठाकरेंना हे महाविकास आघाडीचे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, अशी भाकिते अनेक ज्योतिषांनी वर्तवली असल्याचा प्रश्न विचारताना दिसत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावर आपल्या शैलीत सरकार पडेल असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आल्याचे उत्तर दिले आहे. सुडानेच वागायचे असेल तर मग एक सूड तुम्ही काढा आम्ही दहा सूड काढतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.


संजय राऊतांनी सरकारच्या वर्षपूर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीची पहिली झलक चांगलीच व्हायरल होत आहे. यात संजय राऊत यांनी पूर्णपणे, उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रात हे अघोरी प्रयोग सुरु झाल्याचे विचारले असता यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंबे आणि मुलेबाळे आहेत, त्यांना सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंब आणि मुलेबाळे आहेत. तुम्हीही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो.

संजय राऊत या प्रोमोत मुख्यमंत्री ठाकरेंना महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्रात कोण कोणाचा सूड घेत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा पलिकडे काय सांगणार? असे सवाल करताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा पलिकडे काय सांगणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणत आहेत की, ठिक आहे, हात धुत आहे, जास्त अंगावर आले तर हात धुवून मागे लागेल. तुम्ही विकृत बुद्धीचे चाळे करु नका. विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते, तेव्हा मला अधिक स्फूर्ती येते. कुणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना आडवे करुन महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी या प्रोमोमध्ये दिला आहे.