स्कॉटलंड ठरला महिलांना सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देणारा जगातील पहिला देश


लंडन: स्कॉटलंड सरकारने एक महत्वाचे पाऊल महिलांचे आरोग्य ध्यानात घेऊन उचलले आहे. स्कॉटलंड हा सर्व वयोगटातील महिलांना मासिक पाळीशी संबंधित टॅम्पोन्स आणि सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देणारा जगातील पहिला देश बनला आहे. जगभर मासिक पाळीशी संबंधित चालणाऱ्या जागरुकता चळवळीचा हा विजय असल्याचे मानले जाते. युनायटेड किंगडमचा स्कॉटलंड हा एक भाग आहे.

यासंदर्भातील पिरियड प्रोडक्ट बिल मंगळवारी स्कॉटिश पार्लमेंटने बिनविरोध मंजुर केल्यामुळे आता शाळा, विद्यापीठे आणि इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी मासिक पाळीसंबंधित उत्पादने मोफत उपलब्ध करण्यात येतील. स्थानिक सरकारी संस्था आणि शिक्षण संस्थांवर अशा प्रकारची उत्पादने मोफत उपलब्ध होतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी असेल.

गेल्या वर्षी स्कॉटलंडच्या पार्लमेंटमध्ये हे बिल मोनिका लेनन यांनी मांडले होते. या बिलाच्या बिनविरोध मंजुरीनंतर त्यांनी हा महिलांच्या चळवळीचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, जगासाठी स्कॉटलंडचा हा निर्णय दिशादर्शक ठरु शकतो. मासिक पाळीसंबंधित उत्पादने मोफत उपलब्ध करता येऊ शकतात, असा संदेश जगाला मिळेल.

स्कॉटलंड सरकारला यासाठी 2022 सालापर्यंत दरवर्षी 8.7 मिलियन पाउंड एवढा खर्च येण्याची शक्यता आहे. महिला किती प्रमाणात या योजनेचा लाभ घेतात त्यावर बरच काही अवलंबून आहे. स्कॉटलंडमध्ये सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 टक्के महिला या तुलनेने गरीबीत जगतात. युकेतल्या दहा पैकी एका मुलीला सॅनिटरी पॅडस विकत घेणे परवडत नसल्याचे 2017 सालचा एक सर्व्हे सांगतो. मोफत सॅनिटरी प्रोडक्टचा लाभ प्रामुख्याने या वर्गाला घेता यावा यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचेही मोनिका लेनन यांनी सांगितले.

या नव्या कायद्याचे स्कॉटलंडमधील महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या संघटनांनी तसेच अनेक मान्यवरांनी स्वागत केले आहे. या निर्णयावर जगभरातील अनेक महिला संघटनांनी समाधान व्यक्त केले असून स्कॉटलंडच्या या निर्णयाचे अनुकरण जगातील सर्व देशांनी करावे अशी आशा व्यक्त केली आहे. महिलांच्या चळवळीच्या यशात हा कायदा मैलाचा दगड ठरणारा आहे. मोफत सॅनिटरी प्रोडक्ट सर्व वयोगटातील महिलांना उपलब्ध करुन देणारा स्कॉटलंड हा जगातील पहिलाच देश ठरला असल्यामुळे या कायद्याला समर्थन करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशी भावना स्कॉटलंडच्या प्रथम मंत्री निकोला स्टर्जन यांनी व्यक्त केली.