वाघांचे वाढते मृत्यू: मध्यप्रदेशची ‘टायगर स्टेट’ दर्जा धोक्यात


भोपाळ: राज्यात वाघांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत असल्याने मध्य प्रदेशची ‘टायगर स्टेट’ हा दर्जा धोक्यात आला आहे. या प्रकारांची सरकारने दखल घेतली असून वनमंत्री विजय शहा यांनी अचानक बांधवगड अभयारण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखील वाघांच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी बैठक घेणार आहेत.

राज्यात सातत्याने वाघ मृत्युमुखी पडत आहेत. एकट्या बांधवगड अभयारण्यात मागील दीड महिन्यात ३ प्रौढ वाघ आणि २ बछड्यांचा मृत्यू झाला आहे. मागील ११ महिन्यात बांधवगडामध्ये ९ तर राज्यभरात २५ वाघ मरण पावले आहेत. बाधवगडामधील बहुतेक वाघांचा मृत्यू संशयास्पद आहे. वन विभागाचे अधिकारी अधिकृत दुजोरा देत नसले तरी गावोगावी शिकाऱ्यांची ‘वॉंटेड’ म्हणून छायाचित्र दिसत आहेत.

देशात वाघांची सर्वाधिक संख्या मध्यप्रदेशमध्ये असून राज्याला राज्याला ‘टायगर स्टेट’चा दर्जा देण्यात आला आहे. मध्यप्रदेशात वाघांची संख्या ५२६ आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये वाघांची संख्या ५२४ आहे. केवळ काठावरचा फरक असल्याने वाघांचे सतत होणारे मृत्यू परवडणारे नाहीत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार राज्यात ५२६ वाघांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे हद्दीच्या संघर्षातून वाघांचे मृत्यू होत आहेत. मात्र, हे एकमेव कारण नाही. शिकाऱ्यांकडे होणारे दुर्लक्ष हे देखील त्यामागचे प्रमुख कारण आहे.