परदेशातून मुंबईत दाखल झालेले प्रताप सरनाईक क्वारंटाईन


मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर चौकशीसाठी त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले होते. ईडीच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी नेण्यात आल्यानंतर, आज दुपारी १२ वाजता त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

ईडी कार्यालयाने आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सकाळी ११ वाजता ते हजर राहणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिल्यामुळे पिता-पुत्रांची एकत्र चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण परदेशातून आपण आल्यामुळे आपल्याला आठ दिवस सक्तीने क्वॉरंटाईन राहावे लागत आहे. त्याचबरोबर विहंगची पत्नीही आजारी असल्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असे सरनाईक यांनी ईडीला कळवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर तशी विनंती करणारे पत्र ईडीकडे सोपवण्यात येणार आहे.