संशोधकांचा दावा ; शाकाहारी खाणाऱ्यांपेक्षा मांसाहारी खाणाऱ्यांना डिप्रेशनचा कमी धोका


वॉशिंग्टन – जगभरातील लोकांचे खाण्याचा विषय निघाल्यावर प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक म्हणजे शाकाहारी आणि दुसरा म्हणजे मांसांहारी. त्याचबरोबर यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन केवळ गट पडतात असे नाही तर यावरुन मांसांहारी असणे किंवा शाकाहारी असणे कशा प्रकारे चांगले हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडील मंडळी करत असतात. मात्र नुकत्याच एका समोर आलेल्या संशोधनाद्वारे मांसांहारी विरुद्ध शाकाहारी या वादात संशोधकांनी मांसांहारी असणे अधिक फायद्याचे असल्याचा कौल दिला आहे.

शाकाहारी खाण्यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते, असे अमेरिकेतील अल्बामा विद्यापिठामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये दिसून आले आहे. खाण्याच्या सवयींबद्दलच्या आधीच्या एकूण 18 संशोधकांचा आधार या संशोधनामध्ये घेण्यात आला. एक लाख 60 हजार 257 जणांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. या व्यक्तींच्या खाण्याच्या सवयी, ते कोणते पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात आणि त्याचा त्यांच्या मानसिक परिस्थितीवर काय परिणाम होतो याचा संबंध जोडणारी निरीक्षणे या अभ्यासात नोंदवण्यात आली. क्रिटीकल रिव्ह्यू या जर्नलमध्ये हे संशोधन छापून आले आहे.

शाकाहारी भोजन करणारे किंवा व्हेगन खाणे खाणाऱ्यांमध्ये डिप्रेशन, अस्वस्थता आणि स्वत:लाच दुखापत करुन घेण्याची वृत्ती ही जास्त प्रमाणात असल्याचे या अभ्यासानंतर आढळून आले. वर्तवणुकीवर मांसांहार न करण्याचा थेट परिणाम होतो असे निरीक्षण नोंदवतानाच मांसांहार न करणाऱ्या व्यक्तींची मानसिक स्थिती ही मांसाहार करणाऱ्यांपेक्षा जास्त चिंताजनक असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. पण त्याचवेळी प्राथमिक निष्कर्ष असून खाण्याच्या सवयी आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध अधिक स्पष्टपणे उघड करणाऱ्या विषयांवर आणखीन अभ्यास करण्याची गरज असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.

या संशोधनामध्ये सहभागी झालेले आणि अहवाल लिहिणाऱ्यांपैकी एक असणाऱ्या अल्बामा विद्यापिठातील डॉ. एडवर्ड आर्चर यांनी, “शाकाहारी किंवा व्हेगन खाण्याच्या फायदे आणि धोके याबद्दल मागील अनेक शतकांपासून मतमतांतरे आहेत. मात्र आमच्या संशोधनामध्ये मांसांहार करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य अधिक चांगले असल्याचे दिसून आल्याचे आहे. एखाद्या ठराविक पद्धतीचे खाणे खात असताना त्याचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होईल यासंदर्भात विचार करण्याची गरज असल्याचेही या संशोधकांनी म्हटले आहे.

ही गोष्ट जाणून मांसांहार करणाऱ्यांना नक्कीच आनंद झाला होईल की या संशोधनाचा अहवाल अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेमधील हृदयविकारांशी संबंधित समोपदेशक असणाऱ्या असीम मल्होत्रा यांनी ट्विट करत, सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला मानसिक तणाव, अस्वस्थता आणि स्वत:ला दुखापत करुन घेण्याची वृत्ती टाळण्यासाठी मांसाहार करा, असे म्हटले आहे. जर तुम्ही व्हेगन किंवा शाकाहारी असाल तर तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी काही गुंतवणूक करुन ठेवली पाहिजे, असा सल्लाही मल्होत्रांनी दिला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही