भाजप तोडण्याची, तर आम्ही जोडण्याची भाषा करतो – ओवेसी


हैदराबाद – हैदराबादमधील राजकीय वातावरण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले असून येथे एआयएमआयएम, भाजप आणि टीआरएस या तिन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान भाजप विरोधात एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. भाजप सर्व काही तोडण्याची तर आम्ही सर्व काही जोडण्याची भाषा करतो, अशी ओवेसी यांनी टीका केली आहे.

ओवेसी हैदराबाद पालिका निवडणुकीच्या प्रचारात आजमपुरा येथे बोलत होते. मस्जिद पाडणारे तुम्ही आहात, तर मंदिरासाठी १० कोटी रुपयांची मदत करणारे आम्ही लोक आहोत. नेहमी जोडण्याची भाषा आम्ही करतो तर तुम्ही नेहमी तोडण्याच्या भूमिकेत असता हाच तुमच्यात आणि आमच्यातील फरक असल्याचेही ओवेसी यावेळी म्हणाले.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका मंदिरासाठी तेलंगणा विधानसभेत १० कोटी रुपयांची मागणी केली होती. मुख्यमंत्री त्यावेळी आश्चर्यचकीत झाले होते. तर यामुळे भाजपला फार त्रास झाला होता. येथे सर्वधर्मिय लोक राहतात आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माचे पालन करता यावे, असे आम्हाला वाटते. आमच्या पक्षाचाही हाच विचार असल्याचेही ओवेसी म्हणाले.