राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून एकनाथ खडसेंचे कौतुक


मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंचे कौतुक केले आहे. एकनाथ खडसे यांच्याही नावाचा समावेश विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये आहे. एकनाथ खडसेंच्या नावाची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अद्याप त्यासंबंधीचा निर्णय राज्यपालांनी जाहीर केलेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांचे कौतुक राज्यपालांनी केल्याने राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनील नेवे लिखित त्यांचे आत्मचरित्र ‘जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाची प्रत एकनाथ खडसे यांनी पाठवली होती. पुस्तकावर भगतसिंह कोश्यारी यांनी अभिप्राय लिहून पाठवला असून यामध्ये एकनाथ खडसेंच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय कारकीर्दीचे कौतुक केले आहे.

राज्यपालांनी दिलेल्या अभिप्रायात, जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे हा डॉ. सुनिल नेवे यांनी लिहिलेला ग्रंथ प्राप्त झाला. पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तीमत्व, आपले समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान यांसह आपल्या व्यापक सेवाकार्य यांचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास सुयश चिंतितो, असे म्हटले आहे. १ ऑक्टोबरला हा अभिप्राय पाठवण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील १२ आमदारांची नावे
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे
काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर