समुद्राचे खारट पाणी गोड करण्याच्या महागड्या प्रकल्पाचा फेरविचार करा – आशिष शेलार


मुंबई – समुद्राचे पाणी गोडे करुन मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या प्रकल्पावर १६०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? असा सवाल करत या प्रकल्पाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारे पत्र भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोड करण्याचा १६०० कोटी रुपये एवढा खर्च आहे. मुंबईकरांना हा खर्च परवडणार आहे का? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी विचारला आहे.

मे आणि जून महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतो. पाणी कपातीचे हे संकट टाळण्यासाठी मनोर येथील समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारीकरणाचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. पण हा प्रकल्प खर्चिक असल्याचे भाजपने म्हटले आहे. या प्रकल्पाचा फेरविचार केला जावा, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आशिष शेलार यांनी लिहिले आहे.