ठाणे महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ – निलेश राणे


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक मंगळवारी सकाळी शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी दाखल झाले. ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये शोधमोहिम सुरु केली. ईडीचे पथक प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील पोहोचल्याची माहिती आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. काही राजकारण्यांचाही यामध्ये समावेश आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

मला ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ असून ठाणे जिल्ह्यात आणि शहरात बिल्डिंग किंवा बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार चालतात. शिवसेनेचे ठाण्यातील सर्व नेते ज्या प्रकारचा कारभार करतात, त्यावरून ठाण्यात भ्रष्टाचार उघड आहे हे ठाणेकरांनाही माहिती आहे. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे असल्याचा दावा निलेश राणे यांनी टीव्ही 9 शी बोलताना केला.

त्याचबरोबर ईडी ही सरकारची एजन्सी आहे. ही कारवाई त्यांना काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणूनच केली जात आहे. जर काही चुकीच्या गोष्टी प्रताप सरनाईक यांनी केल्या नसतील तर त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. सरकारची एजन्सी कोणाला तरी काहीतरी वाटते म्हणून काम करत नाही. काही माहिती त्यांच्याकडे आली असेल किंवा तक्रार आली असेल, म्हणून ही कारवाई केली जात असणार, असे मत त्यांनी व्यक्त केले.