फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींसोबतच २०० नेत्यांची २५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्यात नावे


श्रीनगर – अनेक मोठ्या नावांचा जम्मू काश्मीरमधील २५ हजार कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये खुलासा समोर आला आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्लांसोबतच या घोटाळ्याशी संबंध असणाऱ्यांमध्ये अन्य काही नेत्यांची नावे आहेत. यूटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि सीबीआयने आतापर्यंत जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या तपासानुसार १९९८ साली अब्दुल्ला यांनी जम्मूमधील संजवानमध्ये तीन वेगवेगळ्या लोकांकडून तीन कनाल (१०११.७१ स्वेअर मीटर) जमीन विकत घेतल्यानंतर त्यांनी जंगलाचा भाग असणाऱ्या सात कनाल (३५४१ स्वेअर मीटर) जमीनीवर ताबा मिळवून त्यावर घर बांधले.

सीबीआयने केलेल्या चौकसीनुसार जम्मू आणि श्रीनगर येथे रोशनी कायद्याअंतर्गत फारुक अब्दुल्ला यांनी जमीन उपलब्ध करुन दिली तर या कायद्याच्या आधारे त्यांची बहीण सुरैया मट्टू यांनाही आर्थिक लाभ देणारे निर्णय घेण्यात आले. अब्दुल्ला यांच्या जवळच्या व्यक्तींनाही संजवान परिसरामध्ये वन आणि सरकारी जमीनीवर बेकायदेशीर ताबा मिळवला. यामध्ये प्रामुख्याने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली अखून यांच्या नावाचा समावेश आहे.

ज्या सात कनाल जमीनीवर फारुख अब्दुल्लांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला त्याची किंमत अंदाजे दहा कोटी रुपये आहे. या परिसरामध्ये एकूण तीस कनाल (१५१७.७ स्वेअर मीटर) जमीन वेगवेगळ्या लोकांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली असून त्याची किंमत जवळजवळ ४० कोटींपर्यंत आहे.