समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी प्रकल्प उभारणार: मुख्यमंत्री


मुंबई : मुंबईत उन्हाळ्यात करावी लागणारी पाणीकपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाची उभारणीचा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. प्रकल्पाच्या कमला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पावसाळ्यात दरवर्षी पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत १० ते १५ टक्के पाणीकपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी गोडे केल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. जगात अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. काही देशांमध्ये अशा प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरु ठेवण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध असणार आहे. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी होणार आहे. मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोरी येथे शासनाचा भूखंड उपलब्ध आहे तसेच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विनाव्यत्यय पूर्ण होऊन मुंबईच्या नागरिकांना कपातीविना नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

मनोरी येथे २५ ते ३० एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून २०० एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. निर्मिती खर्च ३ ते ४ पैसे प्रतिलिटर इतका खर्च येणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितले.