आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांना असे दिले उत्तर


नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लसीकरणावरून केंद्र सरकारवर काल टीका केली होती. तसेच सरकार कोरोनाच्या लसीसाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न विचारला होता. दरम्यान, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. सर्व सरकारी योजनांच्या माध्यमातून कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

हर्षवर्धन यांनी ही माहिती इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोरोना प्रतिबंधक लसीसाठीचा निधी आणि वितरणाबाबतची माहिती मागितली होती.

बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास राज्यातील जनतेला मोफत कोरोनाची लस देण्यात येईल, असे आश्वासन भाजपने दिले होते. या आश्वासनामुळे वादास तोंड फुटल्यानंतर इतर अनेक राज्यांनीही मोफत लस देण्याची घोषणा केली होती. पण कोरोनावरील लस ही सर्वांसाठी मोफत असल्याचे सांगत आरोग्य मंत्रालयाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

पण या मुद्द्यावरून काँग्रेस सातत्याने आक्रमक राहिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल याच लसीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसी संदर्भात चार प्रश्न विचारले होते. भारतीयांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.

  • भारत सरकार उपलब्ध होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीतून कोणत्या लसीची निवड करणार? आणि का?
  • कुणासाठी सर्वात प्रथम कोरोनाची लस उपलब्ध करुन दिली जाईल? आणि सरकारची त्याच्या वितरणाची योजना काय?
  • पीएम केअर फंडाचा वापर लस मोफत उपलब्ध होईल यासाठी केला जाणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिल्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचेही वृत्त समोर आले आहे. राहुल गांधी यांनी हे प्रश्न यासर्व पार्श्वभूमीवर उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला होता.