किमान शिस्त पाळा: काँग्रेसचा नाराज ज्येष्ठांना इशारा


नवी दिल्ली: पक्षाची कार्यपद्धती आणि धोरणे याबाबत आपली व्यक्तिगत मते सार्वजनिक ठिकाणी मांडू नका. किमान शिस्त पाला असा इशारा काँग्रेसच्या वतीने पक्षातील नाराज ज्येष्ठ नेत्यांना दिला आहे.

पक्षाच्या पडझडीबाबत जारजी व्यक्त करणारे पत्र २३ ज्येष्ठांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिले होते. त्यानंतर कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्या मुलाखतींनी पक्षातील वादाला पुन्हा फुंकर घातली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नाराजांना सुनावले आहे.

पक्षात ‘पंचतारांकित संस्कृती’ फोफावल्याच्या आझाद यांच्या टीकेनंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, शिस्त ही कोणत्याही पक्ष, संघटना किंवा संस्थेचा कणा आहे. किमान शिस्त पाळणे अनिवार्य आहे. ‘पंचतारांकित संस्कृती’बाबत आझाद यांच्या टीकेवरही खेरा यांनी आगपाखड केली. काँग्रेसमध्ये ‘पंचतारांकित संस्कृती फोफावली असती तर हाथरस प्रकरणी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमचे सर्वोच्च नेते रस्त्यावर उतरले नसते, असेही ते म्हणाले. नियुक्त्यांमुळे पक्ष दुबळा बनत असून निवडणुकीद्वारे पदाधिकाऱ्यांची निवड व्हावी करावी, अशी मागणी करणारे आझाद यांच्यासारखे नेते स्वतःच नियुक्तीद्वारे सर्व पदे भोगत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला शिस्तीचे चांगले धडे मिळाले, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

काँग्रेस नेते आणि खासदार कुलदीप बिष्णोई यांनी आझाद यांच्यावर कडवट शब्दात टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचा फायदा व्हावा यासाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम आझाद करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. आझाद यांना पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. ते स्वतः कायमच श्रेष्ठींकडून विविध पदांवर नियुक्त करण्यात आले आहेत.