शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी मंत्र्याचा राष्ट्रवादीत प्रवेश


मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला आणखी धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात धक्का दिला आहे.

जयसिंग गायकवाड यांनी मागील आठवड्यात बंडाचे निशाणा फडकवून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. जयसिंग गायकवाड यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुद्धा सुरू केला होता. आज अखेर मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. जयसिंग गायकवाड हे तीन वेळा बीडचे खासदार तसेच पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहे.

जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपवर सडकून टीका केली. त्या पक्षात कसा राहू, जो मान सन्मान करत नाही, भाजपमध्ये चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट केला जातो. नितीन गडकरी यांचे काय हाल सुरू हे सगळ्यांना माहिती आहेत. भाजपचा काही खुखांर लोकांनी ताबा घेतला आहे, अशी विखारी टीका गायकवाड यांनी केली.

ज्याठिकाणी कोंडमार होतो त्याठिकाणी राहण्यात काहीच अर्थ नाही. मी आता मोकळा श्वास घेत आहे. भाजपमध्ये असताना आम्ही आंदोलने केली, मार खाल्ला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आणि काही नेते हे आयत्या पिठावर रेगोट्ट्या मारतात. ते तर नव्हतेच त्याचा बाप ही नसल्याचे म्हणत गायकवाड यांनी कुणाचेही नाव न घेता टीका केली. तर सामान्य माणसासमवेत नाळ असणारा सतत लोकात असणारे जयसिंग राव हे नेते आहे. सत्ता विनम्रतेने स्विकारायची असते, तसे वागायचे असते, असे म्हणत शरद पवार यांनी गायकवाड यांचे कौतुक केले. तसेच, महाराष्ट्रात वेगळे पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न म्हणून महाविकास आघाडी केली. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत आहे. राज्यातील प्रत्येक घटकासोबत घेत काम करत आहे.