केंद्रातील सत्तेचा भाजपकडून गैरवापर: शरद पवार


मुंबई: केंद्रात असलेल्या सत्तेचा भारतीय जनता पक्षाकडून गैरवापर केला जात आहे. शासकीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना संपविण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या छाप्याबद्दल बोलताना त्यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले. राज्यात पुन्हा सत्तेत येणार नसल्याच्या नैराश्यामुळे भाजप असे उद्योग करीत असल्याचे ते म्हणाले.

भाजपमध्ये लोकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची धमक नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांना त्रास देण्याचे काम ते करीत आहेत. राज्यात पुन्हा सत्तेवर येणे शक्य नसल्याच्या जाणिवेने भाजप नैराश्यग्रस्त आहे. या नैराश्यापोटी केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर करून असले प्रकार ते करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला सर्वसामान्यांचा पाठींबा आहे. हे सरकार सर्व घटकांना बरोबर घेऊन पुढे जाणारे आहे. राज्याचा कारभार वेगळ्या पद्धतीने चालविण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे, अशा शब्दात पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले.

दानवेंच्या ज्योतिषाच्या ज्ञानाबद्दल माहिती नव्हते
भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी राज्यात दोन- तीन महिन्यात भाजप सत्तेवर येईल, असे विधान नुकतेच केले होते. त्यांच्या या विधानाबाबत विचारणा केली असता पवार यांनी त्यांची खिल्ली उडविली. दानवे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. मात्र त्यांना ज्योतिषी म्हणून कधी ओळख मिळाली याची कल्पना नाही. त्यांना ज्योतिषाचे ज्ञान असल्याची माहिती नव्यानेच मिळत आहे, अशा शब्दात पवार यांनी दानवे यांना टोला लगावला.