कराचीच नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा – संजय राऊत


मुंबई – शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्स या बेकरीचे नाव बदलण्याच्या केलेल्या मागणीवरुन आता राजकीय पडसाद उमटायला लागले असून नितीन नांदगावकर यांच्या या मागणीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना एक दिवस भारतात कराचीच असेल असे म्हटल्यानंतर संजय राउत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

संजय राउत फडणवीसांवर टीका करताना म्हणाले, कराचीच नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा. मुंबईतील कराची स्वीट्स या साखळी बेकरीचे नाव बदलण्याची मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केली आहे. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना कराची शिवसेनेच्या भूमिकेला टोलवत उलट ‘अखंड भारत’वर आमचा विश्वास असल्याचे म्हणत आम्हाला विश्वास आहे की कराची एक दिवस भारताचा भाग असेल, असे म्हटले होते.

नितीन नांदगावकर यांनी नुकतीच मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी केली होती. कराची पाकिस्तानातील शहर असल्यामुळे भारतात या शहराच्या नावाने दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होत असल्याचे नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटले होते.