एक दिवस भारतात असेल कराची, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला


मुंबई – मुंबईतील कराची स्वीट्स या साखळी बेकरीचे नाव बदलण्याची मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केली आहे. भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कराची स्वीट्सच्या वादावरुन शिवसेनेच्या भूमिकेला टोलवताना उलट त्यांनी कराचीच एक दिवस भारताचा भाग असेल, असे म्हटले आहे.

‘अखंड भारत’वर आमचा विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की कराची एक दिवस भारताचा भाग असेल, असे फडणवीस म्हणाले. नितीन नांदगावकर यांनी नुकतीच मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी केली होती. कराची हे शहर पाकिस्तानातील असल्यामुळे या शहराच्या नावाने भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होत, असल्याचे स्पष्टीकरण नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर देताना म्हटले आहे.

दरम्यान, मागील ६० वर्षांपासून मुंबईत कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. पाकिस्तानशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांचे नाव बदलण्यास आता सांगण्यात काहीच तथ्य नाही. नाव बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.