देशात पुन्हा एकदा लागू होऊ शकतो लॉकडाउन? मोदींनी बोलावली तातडीची बैठक


नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लस वाटपासंदर्भातील धोरण त्याचबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने कोरोनाबाधित आढळू लागल्यानंतर एक तातडीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तसेच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलग दोन बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होतील.

नरेंद्र मोदी पहिल्या बैठकीत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळू लागले आहेत, अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नंतर इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. कोरोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी या बैठकीत नरेंद्र मोदी चर्चा करतील.

राजधानी दिल्ली त्याचबरोबर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सध्या दिवसाला ५० हजारापेक्षाही कमी देशातील रुग्णसंख्या राहत असताना काही राज्यांमध्ये कोरोना संकट नव्याने उभे राहत असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. लॉकडाउनसंबंधीही चर्चा नरेंद्र मोदींच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होईपर्यंत व तिचा नियमित परवाना मिळेपर्यंत तिच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्याची आणि त्यासाठीच्या कार्यपद्धतीची शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहत आहे. अलीकडेच नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, या लसींच्या किमतीसह आगाऊ खरेदीबाबतच्या बांधिलकीच्या मुद्दय़ावरही चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान कार्यालयाने स्थापन केलेले व्हॅक्सिन टास्क फोर्स (व्हीटीएफ) या लसीच्या आपातकालीन वापराच्या अधिकारांचे नियम तयार करेल, तर या लसी देण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाने (नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९- एनईजीव्हीएसी) या लसीच्या किंमतीसह ती वेळेपूर्वी बाजारात आणण्याबाबतचे नियम तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे या बैठकीत ठरल्याची माहिती एका सूत्राने दिली.

फायझर कंपनीने आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपातकालीन उपयोगासाठी अमेरिकेच्या नियामकांची परवानगी मागितल्याच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्त्व आहे. अशाचप्रकारे लसींच्या आपातकालीन वापरासाठी येत्या आठवडय़ात अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज करण्याचा आपला विचार असल्याचे ‘मॉडर्ना’ या अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनीनेही म्हटले आहे.

दरम्यान, भारतातील पाच लसी नैदानिक चाचण्यांच्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये आहेत. ऑक्सफर्ड-एस्ट्राझेन्का कोविड-१९ लसीच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे; तर भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी देशात विकसित करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यापूर्वीच सुरू केल्या आहेत.

स्वदेशात झायडस कॅडिलाने विकसित केलेल्या लसीने दुसऱ्या टप्प्यातील नैदानिक चाचणी पूर्ण केली आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील एकत्रित चाचण्यांना डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लवकरच सुरुवात करणार आहे.