मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सल्लागाराने नरिमन पॉईंटमध्ये घेतला ५.३ कोटींचा फ्लॅट


मुंबई – अलीकडेच नरिमन पॉईंट भागात ५.३ कोटी रुपयांना मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त, राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी एक फ्लॅट विकत घेतला आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अजोय मेहता हे मुख्य सल्लागार आहेत. मंत्रालयाजवळच्या जग्गनाथ भोसले मार्गावरील समता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरचा फ्लॅट मेहता यांनी विकत घेतला आहे. या फ्लॅटचा कार्पेट एरिया १,०७६ चौरस मीटर आहे.

या व्यवहारावर ऑक्टोंबर महिन्यात शिक्कमोर्तब झाले होते. फ्लॅटसह इमारतीत दोन कार पार्किंगचे स्लॉटही अजोय मेहता यांना मिळाले आहेत. बाजारभावाने हा फ्लॅट अजोय मेहता यांनी विकत घेतला असून या व्यवहाराची सर्व कागदपत्र पब्लिक डूमेनमध्ये उपलब्ध आहेत. या फ्लॅटची किंमत बाजारभावानुसार ५.३३ कोटी रुपये असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.

अजोय मेहत यांनी हा आलिशान फ्लॅट खरेदी करताना आरटीजीएसने २.७६ कोटी रुपये दिले तर चेकच्या माध्यमातून अडीज कोटी रुपये दिले. करापोटी तीन लाख ९७ हजार ५०० रुपये एवढी रक्कम कापण्यात आली. उपलब्ध कागदपत्रांनुसार, स्टॅम्प ड्युटीपोटी १०.६८ लाख रुपये हा फ्लॅट विकणाऱ्या पुण्यातील अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने भरले. २००९ साली आशिष मनोहर यांच्याकडून चार कोटी रुपयांना हा फ्लॅट अनामित्रा प्रॉपर्टीजने विकत घेतला होता.

मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्याने २८ ऑगस्ट २०२० रोजी १६.८० लाख रुपये ट्रान्सफर फी भरुन हा फ्लॅट ट्रान्सफर करायला परवानगी दिली. ही रक्कम हा फ्लॅट विकणाऱ्या अनामित्रा प्रॉपर्टीजने भरली. अजोय मेहता १९८४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मे २०१९ मध्ये राज्याचे मुख्य सचिव बनले. ते त्याआधी चारवर्ष मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. ३० सप्टेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होणार होते. पण राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. ३१ मार्चला मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर कोरोना संकटामुळे पुन्हा तीन महिने वाढवून देण्यात आले. ३० जूनला निवृत्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली.