फाईव्ह स्टार हॉटेलमधून निवडणुका लढल्या जात नाहीत, आझाद यांचा पक्षाला घरचा आहेर


नवी दिल्ली – पक्षावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलेल्या टीकेमुळे असंतोषाचे वातावरण असतानाच निवडणुकांमध्ये होणाऱ्या पराभवावरुन पक्षाला गुलाम नबी आझाद यांनी घरचा आहेर दिला आहे. आता प्रचारादरम्यान उष्णता आणि धुळीकडे तिकीट मिळवणारे नेते पाठ फिरवतात व त्याऐवजी फाईव्ह हॉटेलमध्ये आरामात बसून राहणे पसंत करतात अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

आमच्या नेत्यांची मुख्य समस्या म्हणजे तिकीट मिळाल्यानंतर सर्वात आधी ते फाईव्ह स्टार हॉटेल बूक करतात. त्यांना तिथेही डिलक्स रुम हवा असतो. ते एसी कारशिवाय बाहेर पडणार नाहीत. ते रस्ते चांगले नाहीत अशा ठिकाणी जाणार नाहीत, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील नेत्यांवर केली आहे. निवडणुका फाईव्ह स्टार हॉटेलमधून लढवल्या जात नाहीत. ही संस्कृती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण कोणतीही निवडणूक जिंकणार नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.

अनेकांनी पक्षाच्या कामगिरीवरुन नेतृत्वावर टीका केली आहे. गुलाम नबी आझाद यांनी त्यासंबंधी बोलताना मोठ्या पदांवर नेमणूक करण्यात आलेल्या नेत्यांवर निशाणा साधत सांगितले की, नेतृत्वाला अनेकजण दोष देत आहेत. पण ब्लॉक किंवा जिल्ह्यातील नेत्यांचा सर्वसामान्यांसोबतचा संपर्क तुटला आहे. कोणाला जेव्हा पद मिळते तेव्हा ते लेटर पॅड, व्हिजिटिंग कार्ड छापतात आणि आपले काम संपले, असे समजतात. पण येथेच खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होते.

यावेळी पक्ष नेतृत्व योग्य कामगिरी करत असल्याचे आझाद यांनी सांगताना म्हटले की, जेव्हा मी निवडणूक प्रभारी होतो तेव्हा सोनिया गांधींच्या नेतृत्वात चार ते पाच राज्यांमध्ये विजय मिळाला होता. कर्नाटक, केरळमध्ये आम्ही जिंकलो. तामिळनाडूत युती केली. आंध्र प्रदेशात २००४ मध्ये विजय मिळवला. पक्ष नेतृत्वाने कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला नाही.