विखे पाटलांना अब्दुल सत्तार यांच्याकडून शिवसेनेत येण्याची ऑफर


श्रीरामपूर : एक वक्तव्य करुन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजकीय भूकंप केला आहे. शिवसेनेची ऑफर राधाकृष्ण विखे पाटील याच्यासाठी घेऊन आल्याचे सांगत शिवसेनेत त्यांना येण्याचे आवाहन केले आहे. पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. सत्तार येथे श्रीरामपूर पंचायत समिती नूतन इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी आले होते. सत्तार यांनी त्यावेळी हे वक्तव्य केले आहे. विखे पाटील यांनी जरी राजकारण नसल्याचे म्हटले तरी राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार लोणी गावात दाखल झाले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत त्यांची चर्चा झाली आणि दोघांनी घरी स्नेहभोजनही केले. खरं तर विखे पाटील भाजपात जात असताना सोबत कोण जाणार ही चर्चा होत असताना अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. पण अब्दुल सत्तार शिवसेनेत आणि विखे पाटील भाजपमध्ये गेले. शिवसेना आज सत्तेत आहे तर भाजप विरोधात आहे. विखे पाटील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, शिवसेनेत त्यांनी यावे अशी ऑफर सत्तार यांनी विखे पाटील यांना दिली आहे. या अगोदरही विखे पाटील शिवसेनेत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबद्दल मी बोलणार असून अंतिम निर्णय ते घेतील, असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

माझे अब्दुल सत्तार हे चांगले मित्र असून पक्षविरहित आमची मैत्री आहे. अब्दुल सत्तार यांना पंचायत समितीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण कोणतीही राजकीय चर्चा झाली आमची नसल्याची प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. श्रीरामपूर पंचायत समिती नूतन इमारतीचे भूमिपूजन करायचे होते. सत्तार हे त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे सत्तार यांना बोलवले होते.