12वीच्या सीबीएसई बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


नवी दिल्ली : 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (CBSE) ने जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने जारी केलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान 12वी 2021 च्या प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान, सीबीएसईच्या वतीने या तारखा संभाव्य असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच बोर्डाच्या वतीने निश्चित तारखांसंदर्भातील सूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तारखांसोबतच परीक्षांची नियमावलीही जारी केली आहे.

सीबीएसई बोर्डाने कोरोनाच्या प्रादुर्भावात प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी नियमावली जारी केली आहे. ज्यामध्ये प्रॅक्टिकल परीक्षांसाठी एक ऑब्जर्वर देखील नेमण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट्सच्या मूल्यांकनावर हा ऑब्जर्वर लक्ष्य ठेवणार आहे. माहितीनुसार, गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्हीही परीक्षक असणार आहेत. तसेच प्रॅक्टिकल परीक्षा सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांचीच असेल.यंदा सर्व शाळांना एक लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळांना ज्या लिंकवर प्रत्येक विद्यार्थ्यांचे गूण अपलोड करावे लागणार आहेत. प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट मूल्यांकनाचे काम संबंधित शाळांमध्येच पार पडणार आहे.

त्याचबरोबर लवकरच सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येतील अशी माहिती बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला असल्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. पण यावर बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी याबाबतच वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.