महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवू नये; आशिष शेलारांना अनिल परबांचा टोला


मुंबई : राज्याचे विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब यांनी माजी शिक्षणमंत्री आणि आमदार आशिष शेलार यांना टोला लगावत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये, असे म्हटले आहे. पत्रकारांनी याबाबत विचारले असता परब म्हणाले की, सत्तेची स्वप्न भाजपला पडत आहेत आणि त्यांनी त्याच स्वप्नात भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कर्तृत्ववान मराठा स्त्रिया पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्याच पार्श्वभूमीवर शेलारांना अनिल परब यांनी टोला लगावला.

अनिल परब राज्यपाल नियुक्त जागांबाबत माहिती देताना म्हणाले की, राज्यपालांना राज्यपाल नियुक्त जागांबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु याबाबत राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.

भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असे वक्तव्य केले होते. शेलार यांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याच दिशेने त्यांच्या या विधानाचा रोख होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

आशिष शेलार यांनी हे वक्तव्य करून एका दगडात तीन पक्षी मारल्याची पण चर्चा होती. या निमित्ताने आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विषयाने अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अस्वस्थता वाढवण्याची खेळी केली. त्याचबरोबर आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेलाही छेद दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.