पुणे पदवीधर मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी


पुणे – पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीच्या प्रचारात सर्वच उमेदवार गुंतले आहेत. अशात शनिवारी खळबळ उडवून देणारी पुण्यात घटना घडली. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरून रुपाली पाटील यांना धमकी देण्यात आली असून, धमकी देणारी व्यक्ती साताऱ्यातील आहे. पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी राज्यात निवडणूक होत आहे. सर्वच मतदारसंघात प्रचार रंगू लागला आहे. पदवीधर मतदारसंघाची पुण्यातही निवडणूक होत असून, या जागेच्या निकालाकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. भाजपकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड, तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेक जण या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना देण्यात आली आहे. लबाडे आडनाव असलेल्या सातारा येथील व्यक्तीने पाटील यांना धमकी दिली आहे. फोन करून आरोपींने ‘तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस, अशी धमकी दिली आहे. रूपाली पाटील यांनी या धमकीच्या फोननंतर पोलिसांत धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार दिली आहे.