पित्याला बॉलीवूडची तर पुत्राला बार आणि पबची काळजी; आशिष शेलारांची घणाघाती टीका


पुणे – सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात हे महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असून कोणाचेही त्यांना काही देणेघेणे नाही. फक्त बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाणार नाही याची मुख्यमंत्र्यांना काळजी आहे, तर पब आणि बारची पुत्राला चिंता आहे. मुंबईतून बॉलिवूड बाहेर जावे, असे आमचे बिल्कुल म्हणणे नाही. कोणीही रेस्तराँ आणि बारची वेळ वाढवयाची मागणी केली नव्हती तरी त्यांची वेळ वाढवण्यात आली, या दोनच गोष्टींची काळजी सरकार करत असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारवर त्यावेळी जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी विविध विषयांवर यावेळी भाष्य केले. पब बार उघडण्यापूर्वी मंदिरे उघडण्याची मागणी चुकीची नाही. ते जर नियम घालून उघडले जाऊ शकते. तर मंदिरे नियम घालून का नाही उघडली गेली नाही. सरकारने राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात आमच्याशी चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे. चर्चा केल्यानंतर भाजपची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू.

पण स्थानिक प्रशासनाने कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. आधी भाजपशी चर्चा करावी आणि मग शाळांच्या संदर्भात आंदोलन करायचे की नाही ते ठरवू. आमची सत्ता जर असती तर सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेतला असता. पण हे सरकार असे काही करताना दिसत नसल्याचेही शेलार यावेळी म्हणाले.

काल मुंबईत मी केलेल्या वक्तव्याचा राजकीय कोणताही संबंध नाही. ती ज्ञानेश महारावांनी केलेल्या वक्तव्यावरती टिप्पणी होती. मुख्यमंत्रीपदाच्या क्षमतेचा मी कार्यकर्ता नाही. ज्या वेळेस आमचे सरकार येईल त्यावेळेस मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील आणि फक्त मराठा समाजातील स्त्री नव्हे तर सर्व समाजातील स्त्रीला हे सर्वोच्च स्थान मिळायला हवे ही माझी भूमिका असल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

जी नावे राज्यपालांना राज्य सरकारने दिली आहेत. त्यासाठी २१ नोव्हेंबर पर्यंतची मुदत होती. पण राज्यपालांना अल्टीमेटम देणे ही कुठली पद्धत आहे. असा अल्टीमेटम देण्याच्या मनोवृत्तीचे हे कसे काय प्रदर्शन करतात. राज्यपालांना दिलेला अल्टीमेटम आम्हाला मान्य नाही. त्याला राज्यपाल जुमानतील असेही वाटत नसल्याचे ते म्हणाले.

महावितरणने देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चांगले काम केले आहे. वाढलेली थकबाकी ही शेतकऱ्यांना दिलेल्या थकबाकीची मुदत दिल्याने वाढली आहे. या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसेल, तर त्याची चौकशी करावी. आम्ही तयार आहोत. पण महाविकास आघाडीतील भांडणामुळे सर्वसामान्यांचे मात्र नुकसान व्हायला नको, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.