कोरोनासारख्या आणखी एका संकटाचा जगाला धोका; WHO ने दिला इशारा


जेनेवा: जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढच होत असून भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट सुरू होती. पण दिवाळी सणानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. केंद्र सरकारने काही राज्यांमध्ये वैद्यकीय पथके पाठवली आहेत. त्याचबरोबर केंद्राने आणखी काही राज्यांमध्ये पथके पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे जगातील देशांमधील परिस्थिती चिंताजनक होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे.

जगासमोर कोरोनासारखे आणखी एक संकट येऊन ठेपले आहे. या संकटामुळे जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर वैद्यकीय क्षेत्राची एक शतकाची मेहनत वाया जाईल, अशी धोक्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या संक्रमणावरील औषधाची परिणामकारकता कमी होण्याच्या स्थितीला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स असे म्हटले जातं. याचा अर्थ स्वत:मध्ये विषाणू बदल करतो. त्यामुळे औषध प्रभावी ठरत नाही. ही परिस्थिती विषाणूची प्रतिकारशक्ती वाढल्याने उद्भवते.

कोरोना महामारीप्रमाणेच अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढणे धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधानोम यांनी म्हटले. वैद्यकीय क्षेत्राचे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे प्रचंड मोठे नुकसान आहे. यामुळे एका शतकाची मेहनत वाया जाईल. आरोग्य क्षेत्रासाठी हा अतिशय मोठा धोका असेल. स्वत:मध्ये विषाणूने बदल केल्यास औषध त्यासमोर फारसे प्रभावी ठरत नसल्यामुळे लहान जखमा किंवा संक्रमणदेखील भीषण स्वरूप धारण करू शकते, अशी भीती ट्रेडोस यांनी व्यक्त केली.

औषधांचा माणूस आणि पशूंवर अधिक प्रमाणात वापर होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढल्याचे ट्रेडोस यांनी सांगितले. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स कोणताही आजार नाही. पण आजारा एवढाच किंबहुना एखाद्या महामारी एवढाच धोकादायक असल्यामुळे एका शतकात वैद्यकीय क्षेत्राने केलेल्या प्रगतीवर पाणी फिरेल. आज अतिशय सहजपणे होणाऱ्या संक्रमणांवरील उपचारदेखील अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे होऊ शकणार नसल्याचे ट्रेडोस म्हणाले.