जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यातील शाळा सुरु आणि बंद


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे.

राज्य सरकारने स्थानिक पातळीवर शाळांबाबतचा निर्णय सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे. नेमका कोणता निर्णय घ्यायचा?, पालकांची संमती कशी मिळवायची?, विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी कशी घ्यायची? शिवाय 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असली तरी 50 टक्के विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण मॅनेज कसे करायचे असे अनेक प्रश्न शिक्षक आणि प्रशासनासमोर आहेत.

दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व शाळा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्यातील अन्य जिल्ह्यातील शाळा सुरु होणार की नाही याबाबत संभ्रम अद्याप कायम आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा याबाबत तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.

सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी 60 हजार विद्यार्थी शाळेला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी 60 हजार विद्यार्थी उपस्थित राहतील.

जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यातील शाळा सुरु आणि बंद?

  • 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंद
  • नाशिकमधील शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय रविवारी
  • पुण्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही
  • 23 नोव्हेंबरपासून अहमदनगरमधील शाळा सुरु
  • नागपूरमधील शाळा सुरु होणार
  • कोल्हापूरमधील शाळांमध्ये सध्या सॅनिटायझेशन सुरु
  • रत्नागिरीमधील शाळांसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • सिंधुदुर्गमधील शाळांसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • पनवेल वगळून 23 तारखेपासून रायगडमधील शाळा सुरु
  • सोमवारपासून सोलापूरमधील शाळा सुरु
  • नांदेडमधील शाळांसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • बीडमधील शाळांसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही