भारतीय स्पर्धा आयोगाची रिलायन्स- फ्युचर ग्रुपच्या डीलला मंजुरी


नवी दिल्ली : भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील कराराला मंजुरी दिल्यामुळे अमेरिकन प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, ऑगस्टमध्ये फ्युचर ग्रुपचा रिटेल, होलसेल, वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक्स व्यवसाय घेण्यासाठी रिलायन्स समूहाने 24,713 कोटी रुपयांच्या करार केला होता. या कराराला अ‍ॅमेझॉन विरोध करीत असून कंपनीच्या बाजूने सिंगापूर लवादाच्या कोर्टाने निकाल दिला होता.


शुक्रवारी ट्विट करून सीसीआयने सांगितले की, रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाइफस्टाईल लिमिटेडद्वारे फ्युचर ग्रुपच्या रिटेल, घाऊक आणि लॉजिस्टिक व्यवसायाला अधिग्रहण करणाऱ्या या कराराला मंजुरी दिली आहे. बाजारातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि स्पर्धा ठेवण्यासाठी सीसीआय नियामक म्हणून काम करते.

दरम्यान अ‍ॅमेझॉन फ्युचर -रिलायन्स कराराविरूद्ध कायदेशीर लढाई लढत आहे. दिल्ली उच्च न्यायालयातही फ्युचर ग्रुप आणि अ‍ॅमेझॉन यांच्यातील प्रकरण विचाराधीन आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फ्युचर ग्रुपच्या करारामध्ये अ‍ॅमेझॉनचा हस्तक्षेप करण्याच्या स्थगितीच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला. त्यावर संबंधित पक्षांना आपला लेखी प्रतिक्रिया सादर करण्यासाठी न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

या कराराबद्दल सेबीकडे अ‍ॅमेझॉननेही तक्रार केली आहे. आपल्या अंतरिम निर्णयामध्ये फ्युचर ग्रुप आणि मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजमधील 24,713 कोटी रुपयांच्या कराराचा आढावा घेताना सिंगापूर लवाद कोर्टाने त्यावर स्थगिती दिली होती.