कराची स्वीट्स; नितीन नांदगांवकर यांच्यावर संजय निरुपम यांची बोचरी टीका


मुंबई – शिवसेनेचे डॅशिंग नेते नितीन नांदगांवकर यांनी शहरातील कराची स्वीट्स दुकानाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. देशातील सैनिकांचा कराची स्वीट्स या नावामुळे अपमान होत असल्याचे नितीन नांदगांवकर यांचे म्हणणे होते. नांदगांवकर यांनी त्यासाठी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत निवेदन देत समज दिली होती. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर त्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.


यासंदर्भात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणतात देशातील चायनीज हॉटेलचा चीनशी काडीमात्र संबंध नाही, त्याचबरोबर पाकिस्तानशी वांद्रे येथील कराची स्वीट्सचे कोणतेही नाते नाही. शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना हे सत्य कधी समजणार? ७० वर्ष जुन्या दुकानाचे नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी.

तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे स्पष्ट केले. ६० वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स या मुंबईत आहेत. पाकिस्तानशी त्यांचा काहीही संबंध नसल्यामुळे त्यांच्या दुकानाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले.