पंढरपुरात आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेतही लागू होणार संचारबंदी


पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्निक होण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. नियम, अटींसह शासकीय महापूजा करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रा काळातही पंढरपुरात संचारबंदी लागू होणार असून तेथील एसटी बससेवा देखील 4 दिवस बंद राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासन गंभीर बनले आहे. कोरोनाचा प्रसार कार्तिकी काळात पुन्हा वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

22 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपासून पंढरपूरमध्ये 26 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होत असताना दशमीच्या रात्री बारा वाजेपासून म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील 5 ते 10 किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.

मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी वारकरी संप्रदाय करीत असला तरी कोरोनाचा वाढत धोका पाहून शासन व प्रशासन यास तयार होईल अशी परिस्थिती नाही. पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्या महाराज मंडळींना यात्रा काळात कोरोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही सवलत देता येईल का यावर सध्या प्रशासन विचार करीत आहे.