निस्सानची मॅग्नाईट सबकॉम्पॅकट एसयूव्ही डिसेंबरमध्ये येणार भारतीय बाजारात


मुंबई: निस्सान इंडियाने आपल्या मॅग्नाईट सबकॉम्पॅकट एसयूव्ही गाडीच्या भारतीय बाजारपेठेतील आगमनाची तारीख जाहीर केली आहे. मॅग्नाईट सबकॉम्पॅकट एसयूव्ही दि. २ डिसेंबर रोजी भारतीय बाजारात दाखल होत आहे. या गाडीच्या किंमती इंटरनेटवर लीक झाल्या आहेत. त्यानुसार याच्या प्राथमिक मॉडेलची किंमत साडेपाच लाख तर सर्वाधिक किंमत ९ लाख ५५ हजार असणार आहे. स्पर्धेचा विचार करून गाडीची किंमत आकर्षक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कंपनीने मॅग्नाईट सबकॉम्पॅकट एसयूव्हीचे उत्पादन सुरू झाल्याची माहिती यापूर्वीच दिली होती. आता या गाड्या शो रूममध्ये पोहोचत आहेत. ही कार सीएमएफ ए प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. यामध्ये इंजिनचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिले १.० लिटर, ७१ बीएचपी, ९६ एनएम पीक टॉर्क असलेले इंजिन आणि दुसरे १.० लिटर टर्बोचार्ज्ड ९९ बीएचपी, १६० एनएम पीक टॉर्क असलेले इंजिन असे पर्याय आहेत. ही गाडी एक प्रति लिटर १८. ७५ किलोमीटर चालेल तर टर्बो इंजिन मॅन्युअल गिअरवर प्रति लिटर २० किलोमीटर धावेल.

मॅग्नाईट सबकॉम्पॅकट एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स देण्यात येणार आहेत. त्यामध्ये एलईडी बाय -प्रोजेक्टर हेड लॅम्प्स, एलईडी डीआरएल, फॉग लॅम्प्स, १६ इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स, ८ इंच टचस्क्रीन इंइंफोटेन्मेण्ट सिस्टम यांच्या सह ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिविटी, ७ -इंच टीएफटी इंस्ट्रुमेंट क्लस्टर, पुश-बटन स्टार्ट, क्रूज़ कंट्रोल, ३६० डिग्री कैमरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश आहे. यामध्ये एक टॅंक पॅकही देण्यात येणार आहे. त्यामध्ये वायरलेस चार्जर, एयर प्यूरिफायर, एंबिएंट मूड लाइटिंग, पॅट लॅम्प्स, जेबीएल स्पीकर्स अशी अनेक फीचर्स मिळणार आहेत.