पाकिस्तानात सापडले तब्बल १३०० वर्ष जुने भगवान विष्णूचे मंदिर


नवी दिल्ली – पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर तेराशे वर्ष जूने एक हिंदू मंदिर शोधले आहे. भगवान विष्णूचे पुरातत्त्वतज्ज्ञांनी शोधलेले हे मंदिर असल्याचे सांगितले जात आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी गुरुवारी या शोधाची घोषणा करताना सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूचे असल्याचे सांगितले.

या मंदिराचा शोध वायव्य पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात बारिकोट घुंडई येथे उत्खननादरम्यान लागला आहे. १३०० वर्षांपूर्वी हे मंदिर हिंदू शाही काळातील हिंदूंनी बांधल्याची माहिती फजल खालिक यांनी दिली. हिंदू शाही किंवा काबूल शाही एक हिंदू राजवंश होते. काबुल खोरे (पूर्व अफगाणिस्तान), गंधार(आधुनिक पाकिस्तान-अफगाणिस्तान) आणि सध्याच्या वायव्य भारतावर ज्यांचे साम्राज्य होते.

पुरातत्त्वशास्त्रज्ञांना उत्खननादरम्यान मंदिराच्या जागेजवळ छावण्यांचे आणि पहारेकऱ्यांसाठी असलेल्या टेहळणी बुरुजांचे अवशेषही सापडलेत. त्याचबरोबर मंदिराच्या जागेजवळ तज्ज्ञांना पाण्याचा कुंडही सापडला आहे. हिंदू भाविक देवदर्शनापूर्वी स्नानासाठी या कुंडाचा वापर करत असावेत असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

हजारो वर्षांपूर्वीच्या पुरातन वास्तूंचे स्वात जिल्हा घर आहे आणि हिंदू शाही काळातील खुणा परिसरात पहिल्यांदाच सापडल्याचे यावेळी खलीक यांनी सांगितले. तर, स्वात जिल्ह्यात सापडलेल्या गांधार संस्कृतीतील हे पहिलं मंदिर असल्याची माहिती इटालियन पुरातत्त्व मिशनचे प्रमुख डॉक्टर लुका यांनी दिली. तसेच स्वात जिल्ह्यात बौद्ध धर्माचीही अनेक पूजास्थळे आहेत.