करण जोहरने चोरले माझ्या चित्रपटाचे नाव; मधुर भांडारकरांचा आरोप


चित्रपटांच्या नावावरुन किंवा त्यांच्या अधिकारावरुन बॉलिवूडमध्ये अनेकदा वाद निर्माण झाल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले आहे. त्याच प्रकारचा वाद पुन्हा एकदा सुरु झाला असून करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी चित्रपटाचे नाव चोरल्याचा आरोप केला आहे.

सध्या कलाविश्वातील सुपरस्टार्सच्या पत्नींवर आधारित चित्रपटाची मधुर भांडारकर निर्मिती करत आहेत. ‘बॉलिवूड वाइव्ज’ असे या चित्रपटाचे नाव आहे. पण करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी याच काळात ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या सीरिजची घोषणा केली. पण मधुर यांनी या सीरिजच्या नावावरुन संताप व्यक्त केला आहे. याच नावाशी संबंधित मी माझा चित्रपट करत असून हेच नाव करण आणि अपूर्व यांनी त्यांच्या सीरिजला देणे चुकीचे असल्याचे मधुर यांनी म्हटले आहे. सोबतच या प्रकरणी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे (आय़एमपीपीए) त्यांनी तक्रार दाखल केली आहे.


मला करण जोहर आणि अपूर्व मेहताने या सीरिजचे नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असे ठेवले तर चालेल का? असे विचारले होते. मीदेखील याच नावाने त्यावेळी चित्रपट करत असल्यामुळे हे नाव ठेऊ नका, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. पण तरीदेखील त्यांनी त्यांच्या सीरिजचे नाव ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ असे ठेवले. हे अत्यंत चुकीचे आहे. कृपा करुन माझ्या प्रोजेक्टचे नुकसान करु नका. तुम्ही या सीरिजचं नाव बदला, अशी माझी नम्र विनंती असल्याचे ट्विट मधुर यांनी केले आहे.

दरम्यान, २७ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या सीरिजचा पहिला सीजन प्रदर्शित होत आहे. सीमा खान, महिप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी यांच्या जीवनावर या सीरिजमध्ये प्रकाश टाकण्यात येणार आहे. तर ‘बॉलिवूड वाइव्ज’ या चित्रपटाची घोषणा मधुर भांडारकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे नाव सेन्सॉर बोर्डामध्ये रजिस्टर देखील केले आहे. शाहरूख खानची पत्नी गौरी खान, शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि राजेश खन्नाची पत्नी डिंपल खन्ना यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपटात असल्याचे सांगण्यात येत आहे.