डिजीटल पद्धतीने होणार काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड


नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाला बिहार विधानसभा निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागल्यामुळे आता पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहे. डिजीटल पद्धतीने काँग्रेसचा आगामी अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले असून डिजीटल पद्धतीनेच पक्षाचा अध्यक्ष निवडला जाणार असल्याचेही अधोरेखित झाले आहे.

पक्षाचा अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाला डिजीटल आयडी कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीने त्यासाठी मतदार यादीही तयार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यांमधील सर्व युनिट्सकडून या ऑथेरिटीने एआयसीसी प्रतिनिधींचे डिजीटल फोटो मागवले आहेत. सुमारे 1500 प्रतिनिधी या निवडणुकीत भाग घेणार आहेत. दुसरीकडे अध्यक्षपद पुन्हा राहुल गांधी यांनाच देण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कुणी दावा केल्यास ही निवडणूक नाट्यमय वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राहुल गांधी या निवडणुकीत विजयी झाल्यास तेच पक्षाचे निर्विवाद नेते असून सर्वात लोकप्रिय नेते असल्यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. परंतु, अध्यक्षपदाचे दावेदार वाढल्यास सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीला पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी हे उभे राहणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पूर्ण तयारी करत आहोत. आम्ही दोन राज्य वगळता सर्व राज्यातील काँग्रेसच्या डेलिगेट्सची यादी मागवली असल्याचे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित एका काँग्रेस नेत्याने सांगितले. जशी यादी 2017 मध्ये होती, तशीच यादी यावेळीही असणार आहे. पण थोड्याफार फरकाने ही यादी अद्ययावत करण्यात येत आहे. यावेळी प्रत्येक डेलिगेट्सच्या आयडी कार्डमध्ये बार कोड असेल. त्यात त्याची सर्व माहिती असेल. हे व्होटर आयडी कार्ड लवकरच संबंधितांना देण्यात येणार आहेत. दोन वर्षाचा नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षाचा कार्यकाळ असेल. अध्यक्षपदाचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यामुळे या जागेवर निवडणूक होत आहे.