31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार मुंबईतील शाळा; आयुक्तांचा निर्णय


मुंबई : राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील शाळा सुरु होणार नसल्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील शाळा येत्या 31 डिसेंबरपर्यंत या बंदच ठेवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्यामुळे मुंबईत जर शाळा सुरु केल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान मुंबई विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वार्डनिहाय अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. शिक्षकांसोबतच सुरक्षारक्षक, क्लार्क आणि सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत होत आहे. मुंबईत राहणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रावर ही चाचणी करता येणार आहे. यावेळी शिक्षकांना आधारकार्ड आणि शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे असणार आहे.

शिक्षण विभागाने राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांची स्वछता आणि खबरदारीच्या उपायांची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाकडे दिली आहे. यानुसार सर्व शाळेत सॅनिटायझेशनसाठी सॅनिटाईजर पुरवणे, विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, ऑक्सिमीटर आणि इतर साहित्य महापालिकेतर्फे पुरवण्यात येणार आहे.